गोव्याचा (दु:ख)पुराणपुरूष

कवी व अवधूत कुडतरकरचे मित्र नरेंद्र बोडके यांनी लिहिलेल्या लेखातील हा निवडक भाग. हा  लेख अवधूत कुडतरकर षष्ट्यब्दीपूर्ती गौरविका ‘पाथेय’मध्ये (28 नोव्हेंबर 2009 रोजी प्रकाशित) आहे.

...
अवधूतची ओळख झाली आणि दु:खाचे कितीतरी कंगोरे समोर आले. पाठीवर दु:खाचे गाठोडे घेऊनच तो फिरत होता. बालपणीच वडील वारलेले. वयोवृद्ध आई, असूनही नसल्यासारखा वडील-भाऊ, मालमत्तेचे खटले, शिक्षणाची परवड, अक्षरश: निष्कांचन अवस्था... अशा स्थितीत आमच्याकडच्या सिगारेटचा एखादा झुरकाही त्याला पुरत असे. एखादी पावभाजी पक्वान्नासारखी वाटत असे. अनेकदा कैक तास त्याने काहीच खाल्लेले नसे. अशाही स्थितीत त्याची साहित्यावरची निष्ठा कधी डळमळीत झाली नाही. तो महान लेखक किंवा श्रेेष्ठ कवी नाही. त्याने तसा कधी दावाही केला नाही; पण लेखनावरची त्याची अविचल निष्ठा हेच त्याचे मला सर्वांत मोठे मोठेपण वाटते.

... कसाबसा तो एस. एस. सी. झाला. कसल्या कसल्या नोकर्‍या त्याने केल्या. त्यात कधी त्याला शारीरिक व्याधींनी ग्रासले. म्हापशाच्या टी.बी.हॉस्पिटलमध्ये वॉचमन म्हणून त्याने काम केले. तिथे बरेच अन्याय पाहिले. त्याच्या पद्धतीने  तो लढला, हरला आणि अखेल ती नोकरी त्याला सोडावी लागली. आत्मचरित्रांमध्ये सापडणारा आदर्शवाद प्रत्यक्ष जीवनात कुठे जातो कुणास ठाऊक ?

मग अवधूत कसली कसली पुस्तके किंवा कायकाय विकत फूटपाथवर बसायचा. त्यात ‘फुलबाग’च्या जुन्या अंकापासून त्याने स्वत: लिहिलेल्या किशोर-बाल साहित्याची छोटी छोटी पुस्तकेही असायची. ‘फुलबाग’चे संपादक अशोक माहिमकर त्याला पत्रे लिहायचे. त्याच्या कविता किंवा कथा छापायचे आणि त्याला  आठवणीने मानधनही पाठवायचे. असे अंक किंवा मनिऑर्डर आलेली असली म्हणजे आमच्या गप्पांना धूम्रवलयांचा साज चढायचा. …

... दरम्यानच्या काळात अवधूतचा ‘रंभागर्भ’ हा संग्रह निघाला. ‘दिगंबरा’ ही कादंबरी तो बरीच वषर्ष लिहित होता. या दोन्ही उपक्रमांत शिवानंद तेंडुलकरची छडी त्याच्यावर उगारलेली असायची. अनेक फेरफार करीत एक विशिष्ट उंची या दोन पुस्तकांमध्ये त्याने नक्कीच गाठलेली आहे.

...त्याच्या आदर्शवाद त्याला बालसाहित्य लिहिण्यास उद्युक्त करीत असावा असा माझा कयास आहे. वैयक्तिक अनुभवांचे साधारणीकरण करण्याच्या प्रयत्नात त्याने कथा लिहिल्या असाव्यात. ‘दिगंबरा’ ही कादंबरी म्हणजे त्याचे आत्मचरित्रच आहे. फक्त खरी नावे लिहिली, तर ते लोक शब्दांत पकडतील या भावनेतून कदाचित त्याने आत्मचरित्राला कादंबरी म्हटले असावे. अर्थात तो लेखकाचा अधिकार मानायला हरकत नसावी. आपले जगणे मांडून मोकळे होण्यासाठी त्याने कादंबरी लिहिली. आंतरिक उर्मीतून कविता लिहिल्या.

...इतक्या अनंत अडचणींतून त्याने स्वत:ला शिल्लक ठेवले हे महत्त्वाचे, नाही का ? पैशाच्या गरजेतून वृत्तपत्रीय स्तंभलेखन किंवा पत्रलेखन त्याने केले असावे. पण मुख्यत्वे तो कवी आहे. योगभ्रष्ट कवी आहे. त्याचे अध्यात्म त्याला तारून नेते आहे. या अध्यात्माच्या शोधात त्याने कैक बुवा पालथे घातले. शेेवटी त्याच्याजवळ त्याला ते सापडले. त्याला रंभागर्भ पोकळीचा शोध लागला. हा शब्द ज्ञानेश्‍वरांनी वापरला होता. केळीच्या गाभ्यात काहीच नसते. पोकळी. तिलाच रंभागर्भ म्हणतात. या पोकळीतूनच तर अख्खे झाड उद्भवते. बीइंग अ‍ॅण्ड नथिंगनेसचा हा खेळ अवधूतच्या लक्षात आला. ‘रंभागर्भ’फळला. अजून काय हवे ? अवधूतने कवितेसाठी संसार मांडला आणि कविता फळवून आपले पौरूष सिद्ध केले.

...फूटपाथवरच्या विद्यापीठात माणसे वाचायला तो शिकला. प्रतिष्ठेच्या आहारी गेलेली माणसे कशी वागतात ते त्याने पाहिले. माणसे आपल्याला कशी टाळतात ते त्याने पाहिले. फूटपाथवरून तो म्हापसा अर्बन बँकेसमोरच्या स्वत:च्या गाड्यावर बसायला लागला. …

...शिक्षण, नोकरी, नाती, पैसा, मालमत्ता अशा सगळ्याच ठिकाणी  त्याने गोते खाल्ले. आई गेली ते दु:ख त्याने कसे पचवले ते मला माहीत नाही. आतेबहिणीने त्याला स्थळ आणले व दारिद्ˆयाशी स्पर्धा करीतच त्याचे लग्न झाले. ...मराठी अकादमीत त्याने 18 वर्षे काढली. ही वर्षे त्याने एरवी कशी काढली असती कुणास ठाऊक.


‘रंभागर्भ’चा चिरंजीवी कवी

कवी, कथाकार, कादंबरीकार असा कुडतरकर यांचा लेखनप्रवास झालेला आहे. मात्र कुडतरकर ‘रंभागर्भ’सारखी एकच दीर्घकविता लिहून जरी थांबले असते, तरी गोमंतकीय मराठी साहित्यात त्यांचे नाव वज्रलेप बनून राहिले असते इतकी ही कविता काळजाचा ठाव घेणारी आहे.
- पुष्पाग्रज ऊर्फ अशोक नाईक तुयेकर
(‘पाथये’ गौरविकेतील संपादकीयातून)
नवीन आवृत्ती : 2013, मित्र समाज प्रकाशन, कुंकळ्ळी (गोवा)

एक मुलाखत

(‘काळ बदलला तरी माणसाची व्यथा तीच...’ या शीर्षकाची मुलाखत ‘पाथेय’ गौरविकेत आढळली. ती मिलिंद म्हामल यांनी घेतलेली आहे, असे नमूद होते. मुलाखतीच्या शेवटी ही मुलाखत ‘मैत्र’मध्ये जून 2005 च्या अंकात प्रसिद्ध झाल्याचे म्हटले आहे. गोमंतक मराठी अकादमीच्या मुखपत्राचे नाव ‘मैत्र’ होते.)



गेली तीस वर्षे आपण सातत्यानं लेखन करीत आहात. आपल्या जीवनातील प्रवासात आपण अनेक अनुभव घेतले आणि ते कागदावर उतरविले. लेखनाची प्रेरणा आपणाला कुठून मिळाली ?

              तशी लेखनाची प्रेरणा स्वयंभू असावी. एकांतात गुणगुणण्याची सवय अगदी बालपणातली. ‘व्यंकटेश स्तोत्र’ ही देवीदास कवीची कविता आईच्या मुखातून श्रीगणेशा लिहिण्यापूर्वीच नेहमी ऐकत होतो. हरिभजन, रामायण ग्रंथाची पारायणे आई करायची. अशा प्रकारे मराठी भाषा सतत कानावर पडायची. बाराखडी तिनंच शिकवली. प्रसिद्ध झालेलं सगळं वाचायची, परंतु मी साहित्यिक व्हावं असं तिला वाटत  नव्हतं. नातेवाईकही त्यानं नोकरी करावी, साहित्यानं पोट भरणार नाही वगैरे सांगून उद्वेग निर्माण करत होते. पण माझा एक निर्धार होता. अध्यात्म व साहित्य हा जीवनाचा अविभाज्य भाग होता. सारस्वत विद्यालयात अ‍ॅड. पांडुरंग मुळगांवकर यांच्या हस्ते ‘छोट्या गोष्टी’ हे पहिलं बालकथेचं पुस्तक प्रकाशित झालं. त्यावेळी मी नववीत शिकत होतो. शिक्षकांनी कौतुक केलं. दुर्गा प्रिंटिंग प्रेसच्या सहकार्यानं ते प्रसिद्ध झालं. घरच्या मंडळींकडून पोषक प्रोत्साहक शब्द कधीच मिळाले नाहीत. दु:खद घटना, संकटं लेखनास पुरक ठरली. विषयच स्वत:हून पुढ्यात आले. अन्नाचा कण पोटात नसताना आलेली अनुभूती दिगंबराची उपासमार दाखवताना उपयोगी पडली. आध्यात्मिक अनुभूती अलौकिक जीवन चिचित करण्यात उपयोगी पडली. वाचनामुळं कुणाचं अनुकरण न करता स्वत:ची वाट शोधता आली. हाताला मिळेल  ते वचत होतो. त्यामुळं वेगवेगळे प्रवाह अभ्यासता आले. ज्येष्ठ व मित्रमंडळीकडून प्रोत्साहन मिळालं. शंकर रामाणी, केशव सद्रे, माधवराव गडकरी, प्रा. रवींद्र घवी, प्राचार्य गोपाळराव मयेकर, शशिकांत नार्वेकर या ज्येष्ठांचं प्रोत्साहन प्रेरक ठरलं. दै. राष्ट्रमत, दै. गोमंतक, दै. नवप्रभा, दै. तरूण भारत या सर्वांचं सहकार्य मिळालं. ‘सत्यकथा’नं ‘रंभागर्भ’ कविता स्वीकारून माझ्यातील न्यूनगंड दूर केला व आत्मविश्‍वास निर्माण झाला. दै. सकाळ, दै. मराठा, दै. लोकसत्तामध्ये कविता प्रसिद्ध होऊन गोव्याच्या बाहेर ओळख झाली.


आपल्या म्हापशातील दत्तवाडीच्या वास्तव्याबद्दल आणि म्हापसा बस स्टँडवरच्या पुस्तकविक्रीबद्दल अनेकदा ऐकलं आणि वाचलही. जीवन चालविण्यासाठी काहीतरी करणं भाग होतं. पण आपण पुस्तकविक्रीद्वारे जीवन चालविण्याचा संकल्प केलात ?

         दत्तवाडीला छंद म्हणून सुबोध वाचनालय सुरू केलं. दहा पुस्तकांच्या भांडवलावर पाचशे पुस्तके जमा झाली. नंतरच्या काळात बागायत,घरदार सार्‍यांचा जाहीर लिलाव होऊन जगण्यासाठी म्हापसा बसस्थानकावर फूटपाथवर पुस्तक विक्रीचा धंदा सुरू केला. फूटपाथ असल्यानं नातेवाईक ओळख न दाखवता पुढेे जात. पुस्तकं विकत भर उन्हातही लेखन चालू होतं. खूप लिहिण्याची ऊर्मी होती, पण कागद आणायला पैसा नव्हता. कॅलेंडरच्या तुकड्यांवर मी कविता लिहीत होतो. ‘रंभागर्भ’ची निर्मिती अशीच तुकड्या तुकड्यावर झाली. ‘रंभागर्भ’ला पुरस्कार मिळाल्यावर एक रीम कागद खरेदी केला, त्याचा उपयोग ‘दिगंबरा’ लिहिण्यासाठी करता आला. दै. नवप्रभातील ‘स्वामी सगुणानंद’ नावानं सदर तसेच माझ्या नावानं ‘जनविजन’ सदर पुस्तकविक्री करत असता लिहिलं. यावेळी श्री. सुरेश वाळवे यांनी सहकार्य दिलं. सर्व मजकूर ते स्वत: वाचून पाहत. वाचकांच्या प्रतिक्रिया सांगत. पुस्तकविक्रीचा व्यवसाय निवडण्यामागं अशी कारणं होती. माझी स्वत:ची प्रकाशित केलेेली पुस्तकं ठेवता येत होती. एका दुकानदारानं आपला संपूर्ण साठाच उधारीवर दिल्यानं खिशात काही नसताना व्यवसाय करता आला. ‘नाईक अ‍ॅण्ड सन्स’ने बसायला जागा दिली. श्री. रघुवीर सिरसाट यांनी पुस्तकाची शोकेस ठेवायला जागा दिली. त्यामुळेच बेकार राहण्याचं संकट टळू शकलं. या काळात म्हापशात मिळालेलं सहकार्य कधीच विसरता येणार नाही. माझ्या जीवनाच्या जडण-घडणीत म्हापसावासीयांचं सहकार्य मिळालं नसतं, तर साहित्य -  लेखनच नव्हे, तर जगणहीं कठीण झालं असतं. शालेय जीवनात व नंतरही म्हापसा शहरानं स्वत:चा ठसा उमटवला.

आपला असा खास वाचकवर्ग आणि मित्रमंडळी आहे. त्याबद्दल थोडंसं...

        दै. ‘नवप्रभा’तील ‘जनविजन’ स्तंभलेखनामुळे अनेक चाहते मिळाले. ‘दिगंबरा’तील अनेक अनुभव त्यात वास्तव म्हणून प्रसिद्ध झालेत. अनेकांचे चांगले अभिप्राय मिळाले. बा. द. सातोस्कर, पु.शि.नार्वेकर, लक्ष्मीनारायण पारज, प्रभाकर भिडे, अनेक ज्येष्ठांनी कौतुकाची थाप पाठीवर मारली. हे सदर एक वर्ष चालविलं. पुस्तकविक्री करत फूटपाथवर लेखन चालू होतं. नंतर लक्ष्मीनारायण पारज यांनी आपलं जुनं कार्यालय लेखनासाठी दिलं. एक वर्ष हे सदर चालवून नंतर दै.‘तरुण भारत’मध्ये ‘स्वैर’नावाचं सदर सुरू केलं. या सदरामुळं आणखी नवीन वाचकवर्ग मिळाला. प्रत्येक वर्तमानपत्राचा स्वत:चा वाचकवर्ग असतो. पूर्वीचे वाचकही ते लेखन वाचायचे व अभिप्राय सांगायचे.
       मित्रमंडळींबद्दल सांगायचं झालं तर थोडक्यात सांगणंही कठीण. स्वत:च्या नात्यापेक्षा मित्रमंडळीचं नेहमीच सहकार्य मिळत आहे. नरेंद्र बोडके यांचा स्नेह सख्ख्या भावाहून अधिक होता. अगदी त्याच्या घरी सुद्धा परकेपणा नव्हता. ‘बुलंद’च्या संपादकपदाचा राजीनामा दिला तेव्हा तो रागावला, पण व्यक्तिगत मित्रत्वात बाधा आली नाही. कविमित्र शंभू बांदेकर यांनीही वेळोवेळी सहकार्य दिलं. उपसभापतीपदी असतानाही पूर्ववत स्नेह ठेवला. अ‍ॅड. रमाकांत खलप प्रतीवादीचे वकील म्हणून थोडा दुरावा निर्माण झाला, पण व्यक्तिगत पातळीवर मी त्यांचं सहकार्य मागितलं व त्यांनी दिलं नाही असं कधी घडलं नाही. अगदी ‘दिगंबरा’ गौरविकेलासुद्धा त्यांनी उदार अंत:करणाने सहकार्य दिलं. व्यापारी सुहास शिंदेही संकटाच्यावेळी पाठीमागं उभे राहिले. प्रा. अनिल सामंत, शिवानंद तेंडुलकर, जयकृष्ण सांगोडकर (त्या काळात कविता लिहायचे), पत्रकार गुरुनाथ नाईक, डॉ. सुरेश नागवेकर, रामनाथ नाईक (म्हापशाचे), सुदाम मोटे, प्रकाश काणेकर (व्यापारी) अशा सर्वांचंच सहकार्य मिळत होतं. साहित्यिक मित्रांबरोबर नव्या लेखनावर चर्चा होत होती. त्यातून कलाकृती सकस होण्यास मदत व्हायची. आपली मतं स्पष्टपणे सांगायचीहा अलिखित नियम होता. लेखन प्रसिद्ध होण्यापूर्वी झालेली चर्चा फायदेशी ठरायची. परस्परांना नेहमी भेटायचं, चर्चा करायची असे ते दिवस होते.


1972च्या सुमारास आपण ‘नवयुवक साहित्य मंडळ’ ही संस्था स्थापन केली. तशी प्रेरणा  कुठून मिळाली आणि त्याचं प्रयोजन काय होतं ?

        1972 सालचे दिवस खूप काही करावं  असं वाटणारे होते. मानवता, समाजसेवा आदर्श वगैरेच्या स्वप्नीय कल्पनांचे दिवस. वास्तवाचे  चटके बसले नव्हते. साने गुरुजी, महात्मा गांधी यांच्या विचारांनी मन भारावलं होतं. तरुण मित्रांनी नवयुवक संघ स्थापन केला होता. नंतर साप्ताहिक ‘न्याय गर्जना’चे संपादक वसंत टोमके भेटले. त्यांची गर्जना काही दिवसांतच ओसरली व ते हताश होऊन गोवा सोडून गेले. या संघाच्यावतीनं नवोदितांच ‘कोरी पाटी साहित्य संमेलन’ घेतलं. प्रा. गोपाळराव मयेकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनातून नवोदित साहित्य मंडळ निर्माण झाले. संपूर्ण गोव्यातून कोकणी व मराठी साहित्यिक या संमेलनास उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यानं ‘ज्योत अंधार दिव्याची’ हा प्रतिनिधीक काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. भाषिकवाद या काळात नव्हता. नंतर कोकणीवाद सुरू झाला. आकाशवाणीवर मराठीला सावत्रपणाची वागणूक मिळू लागली. त्याचा परिणाम कोकणी व मराठी असे दोन गट निर्माण झाले व आम्ही ‘सलोखा’ मुखपत्र फक्त मराठीत सुरू केलं. कोकणी लेखन बंद केलं. मराठी भाषा  व साहित्य यासाठी वाहून घेण्याचा निर्णय मंडळातर्फे घेण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मराठीच्या परीक्षा घेणं सुरू केलं. नरेंद्र बोडके, डॉ. सुरेश नागवेकर, प्रा. अनिल सामंत, योसेफ दूपदाळे, जयकृष्ण सांगोडकर, मिलिंद जोशी, दीपक प्रभुदेसाई यसगळी मंडळी एकमेकांना भेटत होती व साहित्यावर चर्चा वगैरे कार्यक्रम अधूनमधून करत होतो. भाषावादातील मतभेद व्यक्तिगत पातळीवर आणले नाहीत. म्हणून मराठी राजभाषा सत्याग्रहासाठी उपोषण केलं, तेव्हा सत्याग्रह मराठीप्रेमींना पाणी आणून देण्याची जबाबदारी कट्टर कोकणी साहित्यिकानं स्वीकारली. फक्त तो व्यासपीठावर बसला नाही. अशा अनेक आठवणी आहेत. नवोदित मराठी साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देणं हा मुख्य उद्देश होता.

1984 साली म्हापसा येथे सुप्रसिद्ध साहित्यिक नरेंद्र बोडके यांच्या सहकार्यानं आपण त्यावेळी गाजलेलं ‘बुलंद’ हे मासिक चालविलं. तो अनुभव कसा होता ?

           साप्ताहिक ‘बुलंद’चा अनुभव खरोखरच विलक्षण असा होता. सुरुवातीला आम्ही ‘बुलंद’ दिवाळी अंक प्रसिद्ध केला. जाहिराती भरपूर मिळाल्या. त्यातून साप्ताहिक सुरू केलं. यातून स्वत:ची घरं, छापखाना वगैरे स्वप्न रंगवली. नरेंद्राच्या लेखणीनं सगळ्यांना आकर्षित केलं. एक हजार प्रतींवरून चक्क आठ हजारपर्यंत खप वाढला. अनपेक्षित असा सगळीकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. स्वत: विक्रेतेे अंक कधी येणार अशी चौकशी करत. एकाच पक्षाशी बांधिलकी न ठेवता मराठी भाषेची बाजू घेईल तो आपला असं धोरण ठेेवलं होतं. ह्यात म.गो.पक्षातील उमेदवार जास्त होते. तसं सर्वांचं सहकार्य मिळत होतं. अंक आणखी चांगला व्हावा म्हणून नरेंद्रला ऑफसेट प्रिंटिंग करावंसं वाटलं  अन् सर्व रक्कम संपून स्वप्नावर पाणी पडलं.

तुमच्या ‘रंभागर्भ’ ह्या दीर्घकवितेत अनेककेंद्री अनुभूती एकसंघपणे साकारली आहे. सारी प्रतिभासृष्टी गूढ वाटते. आपल्या ‘रंभागर्भ’ ह्या कवितेच्या आशयासंदर्भात…

          ‘रंभागर्भ’कविता मानवी जीवनावरचं विविधरंगी चिंतन होतं. अनेकपदरी काव्य असल्यानं प्रत्येक कडव्यांचा अर्थ व्यक्ती-व्यक्तीनुसार बदलत जातो. वास्तव व अध्यात्म हा मूळ स्रोत. कुणीही वाचावं, अशी द्वय अर्थाची  रचना असल्यानं अनेकांना ही कविता आवडली. ‘सत्यकथे’नं ही कविता स्वीकारली होती, पण मी पुस्तक काढण्याची घाई केल्यामुळं ‘सत्यकथे’च्या वाचकांना मुकलो, कारण नंतर ‘सत्यकथा’ बंद पडलं.

समाजातील खोटारडेपणा, नकलीपणा तुम्ही अनुभवलात, त्याला शब्दाचे रूप देऊन तुम्ही साहित्यनिर्मिती केलीत, त्याबद्दल अधिक सांगावयाचं आहे काय ?

           ‘दिगंबरा’ ही कादंबरी आज लिहिली असती तर खूप वाहवा झाली असती. बुवाबाजी, भ्रष्टाचार आज तर कितीतरी पटीनं वाढलेेला आहे. दामदेव लंगडेबुवा फिके ठरतील. बाकी सगळं तेच आहे. जीवनमूल्यांची पडझड चालूच आहे.

गोमंतकीय मराठी कादंबरीच्या इतिहासात ‘दिगंबरा’ ह्या आपल्या कादंबरीला वेगळे स्थान आहे. ‘दिगंबरा’ कादंबरीची निर्मिती कशी झाली ? कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर वाचकांचा प्रतिसाद कसा होता ?

             ज्येष्ठ कविमित्र वसंत सावंत फूटपाथवरच्या दुकानात मला भेटायला आले. त्यांच्याशी गप्पागोष्टी चालू असता  ते म्हणाले, अरे, यावर चांगली कादंबरी होईल. अशीच आत्मकथनात्मक पद्धतीनं लिहून श्रीविद्या प्रकाशनला पाठव. त्या दिवसापासून ‘दिगंबरा’ लिहायला सुरूवात केली. अनेक सूचनांनुसार फेरफार केले. तीन वेळा पूर्ण लेखन केलं व शेवटी मॅजेस्टिक प्रकाशनच्या सूचनेनुसार शेवटचा हात फिरवला. श्री. मधुभाई कर्णिक यांचं मौलिक सहकार्य मिळालं. कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर बृहन्महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला. वि.शं.चौगुले, शंकर सारडा, नारायण सुर्वे, परेन जांभळे, सुभाष भेण्डे, रवींद्र घवी, डॉ. केशव सद्रे, ग्रामोपाध्ये अशा अनेक ज्येेष्ठ साहित्यिकांनी कादंबरी आवडल्याचं सांगितलं. अहमदनगरच्या एका वाचकाला ‘दिगंबरा’खूपच भावली असं कळालं. प्रा. रवींद्र घवी यांच्या शेेजारी राहणार्‍या एका प्राध्यापकानं सद्गतीत स्वरात अशी कादंबरी या वर्षांत वाचली नसल्याचे सांगून अभिनंदन केलं. डॉ. आनंद पाटील सरांनी या कादंबरीची गॉर्की, नायपाल यांच्याशी तुलना करणारा निबंध इंग्रजीत सादर करून आश्‍चर्याचा सुखद धक्का दिला. अनेक वाचकांना कादंबरी भावली.


आपल्या ‘दिगंबरा’ ह्या कादंबरीवर मोठा वाद निर्माण झाला, त्यासंबंधी आपल्याला काय सांगायचय ?

                कादंबरीवर वाद झाला त्याचं मला काही वाटलं नाही. फक्त एका साहित्यिकाने माझ्यावर व्यक्तीगत टीका करून हे आत्मवृत्त असून याच्यापेक्षा चंद्रकांत जाधवांनी खूप दु:ख भोगलं आहे...वगैरे सांगितलं याचं वाईट वाटलं. दलितांची भूक व इतरांची भूक वेगवेगळी नसते. जन्मानं नसेल, पण परिस्थितीनं काही काळ तरी मी दलितच बनलो होतो. हा अनुभव साहित्यात येणं स्वाभाविक होतं.  दुसर्‍या एका गृहस्थानं ‘दिगंबरा’ अश्‍लील आहे, स्त्रीदेहाचं भयंकर वर्णन आहे वगैरे सांगितलं. त्यांनी अमुक कलमाखाली अटक करावी असं सांगितलं. तसा मी जाम घाबरलो. त्या दिवशी लगेच अटक होईल असं वाटलं. यातील गंमत म्हणजे काही दिवसांनी त्याच टीकाकारानं ‘दिगंबरा’तील लंगडे महाराजांचं संपूर्ण कथानक नाव बदलून चक्क आपल्या नावाने ‘दै. नवप्रभा’त लिहिलं. यात मला समाधान वाटलं. त्यानंच टीका केलेल्या चोपड्यात स्वत:च्या नावानं प्रसिद्ध करण्याएवढा मजकूर त्याला गवसला. नंतर त्या गृहस्थानं विजय तेंडुलकरांची ‘कादंबरी एक’ वाचून म्हटलं, यात फारच भयंकर आहे. त्यामानाने ‘दिगंबरा’त तसे काहीच नाही. आता मला सांगा, त्या गृहस्थानं मला अटक करवून घेतली असतर तर विजय तेंडुलकरांच्या कादंबरीत याहून भयंकर आहे असे जाहीरपणेे सांगितलं असतं? वास्तविक ‘दिगंबरा’त तसं काहीच नाही. ‘दिगंबरा’त आहे तो माणूस. माणूस जे करतो, पाहतो त्याचे त्याच्या मनावर असंख्य तरंग जमा होत असतात. ‘दिगंबरा’ तर मनावरचे सगळे तरंग पुसून वेगळ्या आंतरिक विश्‍वासाकडं झेप घेत आहे. ते वर्णन आलं असतं तर पुढचा आत्मदर्शनाचा जो भाग आहे, त्याला महत्त्व नसतं, कारण माणूस वासना दडपण्याचा जेवढा प्रयत्न करतो तेवढ्या त्या जास्तच उफाळून येत असतात. हा निसर्गाचा नियमच आहे. ‘दिगंबरा’ने कोठेही वासना दडपलेल्या नाहीत. सगळं खुल्लमखुल्ला सांगितलं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट दिगंबर यात कुठेही वाहवत नाही किंवा चविष्ट वर्णन पण करत नाही. बाह्य मन व  अंतर्मन याचा संघर्षही तो तटस्थपण पाहतो. वासना चेतवण्यासाठी कुठलीही घटना लिहिलेली नाही. शेवटी दिगंबर त्या रूपककथेचा केशवच्या बडबडीचा कंटाळा आल्याचे सांगतो. असं शृगारिक घटनांचे स्पष्टीकरण केलं.
           काळ बदलला तरी माणूस तोच आहे. नव्या सहस्रकातही सगळ्या घटना आहेत. माणसाचे फक्त कपडे बदलतील. त्याची व्यथा, अंतर्मन तसंच राहणार. उद्या घरोघरी इंटरनेट आले तरी लोक त्यालाही फुले वाहतील. काही बदल झालेत. पण मी जाणीवपूर्वक भडकपणा टाळला. चांगली कविता काल आवडायची, आज आवडते, उद्याही आवडेल. तिला काळाचं बंधन नसतं. तसंच कादंबरीचंही आहे. तशीच ‘दिगंबरा’ अंधश्रद्धेच्या विरोधात आहे म्हणून ‘दिगंबरा’ कादंबरीतून प्रबोधनाचं कार्यही बरंच घडू शकेल. आध्यात्मिक क्षेत्रातील खोटेपणा, भोंदुगिरी तुम्ही दाखवलात हे सगळे भोंदू साधू दिगंबरला भेटले. आज याची खूप गरज आहे. आज अनेक जण कुंडलिनी जागृत करतो म्हणतात. आध्यात्मिक क्षेत्रात तो खोटेपणाआहे. त्यावर प्रकाश टाकला म्हणून ‘दिगंबरा’ कादंबरीमुळे प्रबोधनाचेही काम बर्‍याच प्रमाणात होऊ शकेल.

आपण बालसाहित्य, कविता कादंबरी अशा प्रकारचे विविध लेखन केलं आहे. एखाद्या विशिष्ट विषयावर लिहिण्याचा विचार आहे काय ? सध्या काय लिहिताय ?

          संकल्प करतो, पण वेळेअभावी सिद्धीस जात नाही. एक नाटक व कादंबरी अर्धवट राहिलीय. नियमित प्रवासाचा ताण असह्य होत असल्याचं घरी गेल्यावर आणखीन काम करण्याचा उत्साह राहत नाही. कवितालेखन चालू असतं. मूड येईल त्याप्रमाणे.

गोमंतक मराठी अकादमीत आपण अनेक वर्षं कामाला आहात, त्या निमित्तानं आपणाला अनेक लेखकांना भेटण्याची संधी मिळाली, त्याचा  आपणाला कसा फायदा झाला ?

           मोठी माणसं जवळून पहायला मिळाली. अर्थात पुढं भविष्यकाळात त्याचा फायदा होऊ शकेल. आपलं काम आपण करायचं. चांगल्या कृतीचं फळ उशिरा का होईना पण निश्‍चितपणं मिळतं हा आजवरचा अनुभव आहे. 

साहित्याची निर्मिती कशी होते ? नवीन लेखकांनी त्यासाठी कोणते परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे ?

         साहित्यनिर्मितीची प्रत्येकाची प्रक्रिया वेगवेगळी असते. कुणी एकटाकी लेखन करतात, कुणी दिवस दिवस चिंतन-मनन करून मग झपाट्यानं लिहितात. नवीन लेखकांनी जास्त वाचन करावं. त्या विषयाचा अभ्यास करावा. लेखन लिहिले की पुन्हा चिंतन करून पुनर्लेखन करावं.


कुडतरकर यांच्या कादंबरीची गॉर्की आणि नायपॉल यांच्या कादंबरींशी तुलनात्मक चर्चा

अवधूत कुडतरकर यांच्या ‘दिगंबरा’ या कादंबरीची मॅक्सीम गॉर्की यांच्या ‘मदर’ आणि व्ही. एस. नायपॉल यांच्या ‘अ हाउस फॉर मिस्टर बिस्वास’ या कादंबर्‍यांची एकत्रितपणे तुलनात्मक चर्चा डॉ. आनंद पाटील यांनी केली.
Comparitive Literature : Perspectives and Progression (creative Books, New Delhi, 2005) या ग्रंथात Dialogism and Cultural Identity in Three Novels या प्रकरणात ही चर्चा आहे. या प्रकरणाचा मराठी अनुवाद डॉ. रत्नाकर भेलकर यांनी केला आहे. अनुवादीत प्रकरण ‘अवधूत कुडतरकर यांची दिगंबरा कादंबरी आकलन आणि अनाकलन’(संपादन : शरद नरेश, प्रभात प्रकाशन, जानेवारी 2014 ) या पुस्तकात समाविष्ट आहे.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत संपादक शरद नरेश म्हणतात :
“डॉ. आनंद पाटील हे तौलनिक साहित्य समीक्षेचे वारकरी, धारकरी आणि मातब्बर मानकरी, त्यांनी ‘दिगंबरा’चे तौलनिक परीक्षण, मॅक्सिम गॉर्की या रशियन लेखकाच्या ‘मदर’ व वेस्ट इंडीजचे लेखक व्ही एस नायपॉल यांच्या ‘अ हाऊस फॉर मिस्टर विश्‍वास’ या कादंबर्‍यांशी केली आहे. खरं तर स्थल, काल, परिस्थिती, पार्श्‍वभूमी, उद्देश वगैरे सर्व बाबतीत तिन्ही तीन ध्रुवांवर असाव्या, अशा दूर आहेत. तरी पण तिन्हीतील जातिवाद व वर्गवादाच्या ज्याला ते सांस्कृतिक अस्मिता म्हणतात त्या संदर्भात ते या कादंबरीचा तौलनिक ताळेबंद मांडतात. प्रादेशिक पार्श्‍वभूमीवरील कादंबरीची कांही  वैशिष्ट्ये जागतिक संदर्भात मांडण्याचा प्रयत्न अभिनव आहे यात शंका नाही.’’

संपन्न आत्मप्रत्ययाचं समर्थ दर्शन घडवणारा कवी


(‘पाथेय’ गौरविकेतील प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांच्या लेखातील हा निवडक भाग, प्रा. अडसूळ यांच्या परवानगीने येथे दिला आहे.)

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण काव्यनिर्मितीने गोमंतकीय कवितेमध्ये, आपलं एक वेगळेपण निर्माण करणारा आणि जपणारा कवी म्हणून अवधूत कुडतरकर यांचा उल्लेेख करावा लागेल. 

...
गेली तीन - चार दशके त्यांचे काव्यलेेखन सुरू आहे. सत्कृतदर्शनी (एसआयसी) हा कवी काहीसा अबोल, आत्ममनस्क आणि अलिप्त वाटणारा असला तरी त्याची कविता मात्र अनेक गुणविशेषांनी समृद्ध अशी आहे.
जाणीवपूर्णक आणि गंभीरपणे काव्यलेखन करणार्‍या कुडतरकर यांनी आधुनिक मराठी काव्याचे स्वरूप, प्रवृत्ती, परंपरा, प्रेरणा आपल्यापरीने पाहिल्या, न्याहाळल्या आहेत. विशेषत्वाचे (एसआयसी) बा.सी.मर्ढेकर, पु.शि.रेगे, आरती प्रभू इ. च्या कविता त्यांनी सूक्ष्मपणे आस्वादलेल्या, अभ्यासलेल्या दिसतात. छंद, वृत्त, अलंकाराची बर्‍यापैकी जाण या कवीला असली तरी त्याची बहुतांश कविता मुक्तछंदात्म स्वरूपातच व्यक्त झालेली आहे.
मर्ढेकर, पु.शि.रेगे,आरती प्रभू या कवींच्या प्रभावातून, निखळ अनुकरणातून काव्यलेखनास प्रवृत्त झालेल्या अवधूत कुडतरकरांच्या समकालीन गोमंतकीय कवींपेक्षा कुडतरकरांचं वेगळेपण असं की, कमालीची दुर्बोधता आणि तद्नुषांगिक जुळारपण व शाब्दिक करामती, कसरतींपासून त्यांची कविता अलिप्त राहाताना दिसते. इतकेेच नव्हे तर त्यांच्या मुक्तछंदात्म कवितेला गोमंतकीय मातीतून आलेली, पारंपरिक लोकजीवनातील आंतरिक लयबद्धता प्राप्त झालेली दिसते. त्यांची मुक्तछंदात्म रचना या लयबद्धतेमुळे भावकाव्यातील लयबद्धतेच्या समीप जाणारी वाटते. अशा काही अंगभूत गुणविशेषांमुळे कुडतरकरांच्या कवितेचं वेगळेपण सहज ध्यानात येते.
.......
‘रंभागर्भ’या काव्यसंग्रहातील बहुआयामी दीर्घकविता कुडतरकरांच्या कवितेचं वेगळेपण आणि मोठेपणही सिद्ध करते. आशा-निराशा, सफल-विफल, सुख-दु:ख, वेदना-संवेदना, एक-अनेक यांची त्यांच्या कवितेतील कुशल नि कालत्मक गुंफण जितकी सच्ची आहे तितकीच जातिवंतही आहे. नवकवितेतील विफलतावादी आणि आशावादी अशा दोन्ही धारांचा समन्वय कुडतरकरांच्या या दीर्घकवितेत होताना दिसत असला तरी त्यांच्या कवितेतील आशय नि अभिव्यक्ती, अंतराय नि अंगप्रत्यंग हे पूर्णतया श्री. अवधूत यांच्या ठायीच्या स्वाभाविक अशा निसर्गप्रतिभेतून आकाराला आलेला आहे. या दीर्घकवितेचा धाट (एसआयसी) हा सर्वस्वी कवी कुडतरकरांनी घडवलेला आहे.
....
माणूस स्वत:ला शोधत नाही, त्याचे कवीला आत्यंतिक वैषम्य वाटते. गूढ आणि अनाकलनीय मानवी संबंधांचा कविमन सातत्याने शोध घेत राहाते. स्व-शोधाकडून परशोधाकडे होणारी ही वाटचाल अनेक कटू, गहण (एसआयसी) प्रश्‍नांची उकल करताना दिसते. आयुष्यात पावलोपावली संकटे नि समस्या, निराशा नि शिराश्रितपणा वाट्याला येणारा कवी, ‘अरे, तुम्ही सूर्यवंशी आहात !’ असं ठासून सांगतो, तेव्हा कविमनातील जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा’ या जातकुळीतली वाटते.
....

‘रंभागर्भ’च्याच पायवाटेने पुढे जाणारी परंतु रंभागर्भमधील कवितेपेक्षा अंतर्बाह्य वेगळी असणारी ‘हिमनग’ मधील त्यांची कविता कुडतरकरांच्या कवितेचेे विकसन दाखवणारी आहे. ‘रंभागर्भ’मधील आशय, अभिव्यक्ती आणि कल्पना-संकल्पनांपेक्षा वेगळी अशी, स्वतंत्र रूप असलेली ही कविता, कवी अवधूत कुडतरकरांच्या प्रतिभाशक्तीचं सामर्थ्य आणि संपन्नता प्रत्ययाला आणून देते. थोडी सामाजिक, थोडी चिंतनात्मक, थोडी प्रखर आणि थोडी आशावादी असलेली या संग्रहातील त्यांची कविता लक्षवेधी आणि कवी म्हणून त्याचं गोमंतकीय कवितेमधील स्थान अधोरेखित करणारी आहेत.

नवीन आवृत्ती : 2013, 
मित्र समाज प्रकाशन, कुंकळ्ळी (गोवा)




……...
केवळ काव्यरूप आत्मगते म्हणता येतील अशा प्रकारच्या काही कविता या संग्रहात आहेत. प्रेमजीवनातील, संसारीजीवनातील अनंत समस्यांचा शोध घेणार्‍या या आत्मगतातील वैयक्तिक पातळीवरील आविष्कार त्यातील उत्कटतेमुळे, जिव्हाळ्यामुळेे मनाला भिडतो.
...
या प्रकारच्या आत्मगतात व्यक्त होणारं प्रेमजीवन दु:खाने, निराशेने व्यापलेले आहे. तरीही त्या निराशाजनक जगण्या-अनुभवण्यात जातिवंत काव्य लपलेलं आहे याचा भरभरून प्रत्यय ही आत्मगते देतात.
आत्यंतिक उदास आणि निराशाजनक जीवन वाट्याला येणार्‍या कविमनातील समाजमनस्कता महत्त्वाची म्हणावी लागेल.
...

‘सूर्याश्‍व’ हा अवधूत कुडतरकरांचा तिसरा काव्यसंग्रह, पहिल्या दोन काव्यसंग्रहातील कवितांपेक्षा सर्वस्वी वेगळा म्हणावा लागेल. आजच्या भौतिकवादी आणि परिवर्तनवादी जगातील गोंडस, दिखाऊ आणि फसव्या गती-प्रगतीचा कवी आपल्या कवितांतून अत्यंत परखडपणे परामर्श घेतो. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक जीवनातील दाहक वास्तव कवी ज्या सामर्थ्याने, ताकदीने शोधतो-सांगतो ती प्रगल्भ सामाजिक जाणीव पाहाता कवी कुडतरकरांच्या कवितेचा बदलता चेहरा-मोहरा ध्यानात येतो. सकस सामाजिक आशयाच्या कवितेप्रमाणेच सुंदर निसर्गचित्रे, पावसचित्रे एक चांगला निसर्गकवी म्हणूनही त्यांच स्थान निश्‍चित करतात.
द्वितीय आवृत्ती : 2006, 
प्रभात प्रकाशन, उगवे - पेडणे (गोवा)

………..
‘रंभागर्भ’, ‘हिमनग’, ‘सूर्याश्‍व’ या तीन काव्यसंग्रहातून कुडतरकरांची काव्यप्रतिभा किती बहुप्रसवशील आहे ते ध्यानात येते. एक प्रयोगशील कवी म्हणूनही कुडतरकरांच्या कवितेकडे पाहावे लागेल. विषय, आशय, अभिव्यक्ती, शैली, रचनासौदर्य इ बाबतच्या विविधतेमुळे कविता रूक्ष,
कंटाळवाणी न वाटता ती साधी-सोयी,(एसआयसी), लयबद्ध लक्षवेधी, प्रवाही-प्रत्ययकारी वाटते. गूढ-गंभीरतेचा शोध घेणारी कविता, सामाजिक-राजकीय आशयाची कविता, निसर्गकविता, प्रेमकविता, स्त्रीविषयक कविता अत्यंत यशस्वीपणे लिहिणार्‍या कवी कुडतरकरांच्या कवितेची दखल गोमंतकातील साहित्याभ्यासकांनी विशेषत्वाने घेतलेली दिसत नाही. संख्यात्मकदृष्ट्या कुडतरकरांचं कवितालेखन कमी असेल परंतु ते गुणात्मकदृष्ट्या अत्यंत संपन्न आणि समर्थ आहे. या गुणात्मकतेचं संबंधितांना झालेलं विस्मरण मात्र अनाकलनीय म्हणावे लागेल.
...
गूढ-गंभीर अध्यात्मविषयीची एक चिंतनशील दृष्टी कवीकडे दिसून येते त्याचप्रमाणे गूढत्त्वाच्या खोल-सखोल शोधातून गवसलेला नवीन अन्वयार्थ सांगण्याची कवीमनातील धडपडही दिसून येते.
...
अस्तित्त्वशोधाची ही अनामिक ओढ कवीमनाला पुरती गुरफटून टाकते आणि त्यातून व्यक्त होणारा काव्यात्म अनुभवही त्याच गूढ-गंभीर स्वरूपात व्यक्त होतो.
...

कुडतरकरांच्या कविमनाला निळ्या रंगाचं कमालीचं आकर्षण दिसतं. त्यांच्या किमान दहा कवितांतून त्यांच्या अंतर्मनातील नीलमप्रीतीचे प्रतिबिंब उमटले आहे. निळा रंग हा अथांग अनंताच्या शोधाचं प्रतीक म्हणूनही त्यांच्या कवितेत व्यक्त होतो. बोरकरांच्या नंतर इतकं नीलमप्रेम कुडतरकरांच्याच कवितेत व्यक्त झालेलं दिसतं.

‘दिगंबरा’: कादंबरी येण्यामागची गोष्ट



(दिगंबरा कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीतील लेखक अवधूत कुडतरकर यांचे ह्रद्गत)

‘दिगंबरा’चा काही भाग नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्यावर, ‘दिगंबरा’ही आत्मकथा वास्तव की काल्पनिक ?’ असा प्रश्‍न अनेकांनी विचारला.
तसा खुलासा करणं, ह्रद्गत वगैरे सध्या कालबाह्य बनलेलं आहे. आपण या पृथ्वीवर अवतीर्ण होताना दिगंबर असतो व येथून जाताना दिगंबर बनवतात, तसा दिगंबर  सर्वत्र असतो; पण चर्मचक्षूने तो दिसत नसतो. कुठे दिसला तरी त्यावर आपला विश्‍वास बसत नाही. विश्‍वास बला तरी सांप्रतकालात त्याचा निभाव लागणं कठीण;म्हणून आपल्याला वाटतं तेवढ वास्तव समजावं.
एक दिवस कविवर्य प्रा. वसंत सावंत यांच्याशी गप्पागोष्टी रंगल्या असता ते म्हणाले, ‘कुडतरकर, आपण जे सांगितलं त्यातूनच एक चांगली कलाकृती निर्माण होईल.’
अशा प्रकारे बिजाला अंकुर फुटला. कविमित्र एस. डी. तेंडुलकर व प.पू. गुळवणी महाराजांकडून दीक्षा घेतलेले श्री. हनुमंत डिचोलकर यांनी प्रथम वाचक म्हणून आपली स्पष्ट मते सांगितली. श्री. नारायणराव आठवले यांच्या सूचनेनुसार पहिल्यांदा पुनर्लेखन केले. गोमंतक मराठी अकादमीने 1991च्या कादंबरी लेखनस्पर्धेत प्रथम पारितोषिक देऊन गौरविले. मुद्रितशोधक श्री. मनोहर बोर्डेकर ह्यांनी आपुलकीने व चिकित्सक वृत्तीने मुद्रितशोधन केले.
नंतर वेल वाढू लागली. कळ्या उमलू लागल्यावर कविमित्र सुदाम मोटे यांनी भ्रमरगतीने सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. मधू मंगेश कर्णिक यांच्यापर्यंत सुगंध पोहोचवला.
श्री. मधू मंगेश कर्णिक यांनी सविस्तर सूचना देऊन वेलीसाठी मांडव घातला. मांडवावर वेल फुलू लागल्यावर मान्यवर प्रकाशक श्री. अशोक कोठावळे यांनी फुलं एका सूत्रात गुंफली. ही पुष्पशब्दमाला आता आपल्या हाती सुपूर्द करीत असून तिचं काय करावं हे आपणच ठरवणार आहात.

पहिली आवृत्ती : 1998, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई














नवीन आवृत्ती : 2012, मित्र समाज प्रकाशन, कुंकळ्ळी (गोवा)

एका अनियतकालिकाची गोष्ट

अवधूत कुडतरकर यांनी नरेंद्र बोडके यांच्यासोबतीने 'पाणंद' हे लघुअनियतकालिक चालविल्याचे दिसते. त्याचा हा एक अंक. मराठी लघुनियतकालिकांची चळवळ गोव्यातही सुरू होती हेही त्यातून दिसते.  अंतर्देशीय पत्रावर छापलेला हा अंक आहे. यात 'सलोखा' अंक प्रकाशित होणार असल्याचेही लिहिले आहे.



...आणि ‘यशवंत’


2007च्या फेब्रुवारी - मार्च - एप्रिल महिन्यांचा पहिला  अंक 'यशवंत'ने प्रकाशित केला. कुडतरकर यांनी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर सुरू केलेला हा उपक्रम. पहिल्या  अंकाला नमुना अंक म्हटले आहे. त्यावर संपादक म्हणून अवधूत कुडतरकर तर सहसंपादक म्हणून माधव सटवाणी यांची नावेेआहेत. या अंकानंतर नियमितपणे कुडतरकर अंक प्रकाशित करीत आलेे आहेत. जवळजवळ एकहाती हा अंक ते चालवतात. काही दिवसांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला. आरोग्यस्थिती अत्यवस्त बनली तरीही अंकांमध्ये त्यांनी खंड पडू दिलेला नाही. आर्थिकदृष्ट्या अंकाचा भार न पेलवताही ते तो वाहत आहेेत. या त्रैमासिकात  गोमंतकीय लेखकांबरोबरच गोव्याबाहेरील लेखकांचे लेखनही प्रकाशित झालेले दिसते. अनेक विशेषांकही प्रकाशित झालेले दिसतात. ‘यशवंत’च्यावतीने गोमंतकीय साहित्यिकांचा सत्कारही केला जातो. तसेच साहित्यविषयक स्पर्धाही घेतल्या जातात असे दिसते.

यशवंत त्रैमासिकाचा पत्ता :
संपादक,
‘यशवंत’ त्रैमासिक,
प्रभात प्रकाशन
माऊली मंदिरानजीक,
उगवें, पेडणे - गोवा 403512

पहिल्या अंकाचे मुखपृष्ठ