(‘पाथेय’ गौरविकेतील प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांच्या लेखातील हा निवडक भाग, प्रा. अडसूळ यांच्या परवानगीने येथे दिला आहे.)
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण काव्यनिर्मितीने गोमंतकीय कवितेमध्ये, आपलं एक वेगळेपण निर्माण करणारा आणि जपणारा कवी म्हणून अवधूत कुडतरकर यांचा उल्लेेख करावा लागेल.
...
गेली तीन - चार दशके त्यांचे काव्यलेेखन सुरू आहे. सत्कृतदर्शनी (एसआयसी) हा कवी काहीसा अबोल, आत्ममनस्क आणि अलिप्त वाटणारा असला तरी त्याची कविता मात्र अनेक गुणविशेषांनी समृद्ध अशी आहे.
जाणीवपूर्णक आणि गंभीरपणे काव्यलेखन करणार्या कुडतरकर यांनी आधुनिक मराठी काव्याचे स्वरूप, प्रवृत्ती, परंपरा, प्रेरणा आपल्यापरीने पाहिल्या, न्याहाळल्या आहेत. विशेषत्वाचे (एसआयसी) बा.सी.मर्ढेकर, पु.शि.रेगे, आरती प्रभू इ. च्या कविता त्यांनी सूक्ष्मपणे आस्वादलेल्या, अभ्यासलेल्या दिसतात. छंद, वृत्त, अलंकाराची बर्यापैकी जाण या कवीला असली तरी त्याची बहुतांश कविता मुक्तछंदात्म स्वरूपातच व्यक्त झालेली आहे.
मर्ढेकर, पु.शि.रेगे,आरती प्रभू या कवींच्या प्रभावातून, निखळ अनुकरणातून काव्यलेखनास प्रवृत्त झालेल्या अवधूत कुडतरकरांच्या समकालीन गोमंतकीय कवींपेक्षा कुडतरकरांचं वेगळेपण असं की, कमालीची दुर्बोधता आणि तद्नुषांगिक जुळारपण व शाब्दिक करामती, कसरतींपासून त्यांची कविता अलिप्त राहाताना दिसते. इतकेेच नव्हे तर त्यांच्या मुक्तछंदात्म कवितेला गोमंतकीय मातीतून आलेली, पारंपरिक लोकजीवनातील आंतरिक लयबद्धता प्राप्त झालेली दिसते. त्यांची मुक्तछंदात्म रचना या लयबद्धतेमुळे भावकाव्यातील लयबद्धतेच्या समीप जाणारी वाटते. अशा काही अंगभूत गुणविशेषांमुळे कुडतरकरांच्या कवितेचं वेगळेपण सहज ध्यानात येते.
.......
‘रंभागर्भ’या काव्यसंग्रहातील बहुआयामी दीर्घकविता कुडतरकरांच्या कवितेचं वेगळेपण आणि मोठेपणही सिद्ध करते. आशा-निराशा, सफल-विफल, सुख-दु:ख, वेदना-संवेदना, एक-अनेक यांची त्यांच्या कवितेतील कुशल नि कालत्मक गुंफण जितकी सच्ची आहे तितकीच जातिवंतही आहे. नवकवितेतील विफलतावादी आणि आशावादी अशा दोन्ही धारांचा समन्वय कुडतरकरांच्या या दीर्घकवितेत होताना दिसत असला तरी त्यांच्या कवितेतील आशय नि अभिव्यक्ती, अंतराय नि अंगप्रत्यंग हे पूर्णतया श्री. अवधूत यांच्या ठायीच्या स्वाभाविक अशा निसर्गप्रतिभेतून आकाराला आलेला आहे. या दीर्घकवितेचा धाट (एसआयसी) हा सर्वस्वी कवी कुडतरकरांनी घडवलेला आहे.
....
माणूस स्वत:ला शोधत नाही, त्याचे कवीला आत्यंतिक वैषम्य वाटते. गूढ आणि अनाकलनीय मानवी संबंधांचा कविमन सातत्याने शोध घेत राहाते. स्व-शोधाकडून परशोधाकडे होणारी ही वाटचाल अनेक कटू, गहण (एसआयसी) प्रश्नांची उकल करताना दिसते. आयुष्यात पावलोपावली संकटे नि समस्या, निराशा नि शिराश्रितपणा वाट्याला येणारा कवी, ‘अरे, तुम्ही सूर्यवंशी आहात !’ असं ठासून सांगतो, तेव्हा कविमनातील जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा’ या जातकुळीतली वाटते.
....
‘रंभागर्भ’च्याच पायवाटेने पुढे जाणारी परंतु रंभागर्भमधील कवितेपेक्षा अंतर्बाह्य वेगळी असणारी ‘हिमनग’ मधील त्यांची कविता कुडतरकरांच्या कवितेचेे विकसन दाखवणारी आहे. ‘रंभागर्भ’मधील आशय, अभिव्यक्ती आणि कल्पना-संकल्पनांपेक्षा वेगळी अशी, स्वतंत्र रूप असलेली ही कविता, कवी अवधूत कुडतरकरांच्या प्रतिभाशक्तीचं सामर्थ्य आणि संपन्नता प्रत्ययाला आणून देते. थोडी सामाजिक, थोडी चिंतनात्मक, थोडी प्रखर आणि थोडी आशावादी असलेली या संग्रहातील त्यांची कविता लक्षवेधी आणि कवी म्हणून त्याचं गोमंतकीय कवितेमधील स्थान अधोरेखित करणारी आहेत.
नवीन आवृत्ती : 2013,
मित्र समाज प्रकाशन, कुंकळ्ळी (गोवा)
|
……...
केवळ काव्यरूप आत्मगते म्हणता येतील अशा प्रकारच्या काही कविता या संग्रहात आहेत. प्रेमजीवनातील, संसारीजीवनातील अनंत समस्यांचा शोध घेणार्या या आत्मगतातील वैयक्तिक पातळीवरील आविष्कार त्यातील उत्कटतेमुळे, जिव्हाळ्यामुळेे मनाला भिडतो.
...
या प्रकारच्या आत्मगतात व्यक्त होणारं प्रेमजीवन दु:खाने, निराशेने व्यापलेले आहे. तरीही त्या निराशाजनक जगण्या-अनुभवण्यात जातिवंत काव्य लपलेलं आहे याचा भरभरून प्रत्यय ही आत्मगते देतात.
आत्यंतिक उदास आणि निराशाजनक जीवन वाट्याला येणार्या कविमनातील समाजमनस्कता महत्त्वाची म्हणावी लागेल.
...
‘सूर्याश्व’ हा अवधूत कुडतरकरांचा तिसरा काव्यसंग्रह, पहिल्या दोन काव्यसंग्रहातील कवितांपेक्षा सर्वस्वी वेगळा म्हणावा लागेल. आजच्या भौतिकवादी आणि परिवर्तनवादी जगातील गोंडस, दिखाऊ आणि फसव्या गती-प्रगतीचा कवी आपल्या कवितांतून अत्यंत परखडपणे परामर्श घेतो. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक जीवनातील दाहक वास्तव कवी ज्या सामर्थ्याने, ताकदीने शोधतो-सांगतो ती प्रगल्भ सामाजिक जाणीव पाहाता कवी कुडतरकरांच्या कवितेचा बदलता चेहरा-मोहरा ध्यानात येतो. सकस सामाजिक आशयाच्या कवितेप्रमाणेच सुंदर निसर्गचित्रे, पावसचित्रे एक चांगला निसर्गकवी म्हणूनही त्यांच स्थान निश्चित करतात.
द्वितीय आवृत्ती : 2006,
प्रभात प्रकाशन, उगवे - पेडणे (गोवा)
|
………..
‘रंभागर्भ’, ‘हिमनग’, ‘सूर्याश्व’ या तीन काव्यसंग्रहातून कुडतरकरांची काव्यप्रतिभा किती बहुप्रसवशील आहे ते ध्यानात येते. एक प्रयोगशील कवी म्हणूनही कुडतरकरांच्या कवितेकडे पाहावे लागेल. विषय, आशय, अभिव्यक्ती, शैली, रचनासौदर्य इ बाबतच्या विविधतेमुळे कविता रूक्ष,
कंटाळवाणी न वाटता ती साधी-सोयी,(एसआयसी), लयबद्ध लक्षवेधी, प्रवाही-प्रत्ययकारी वाटते. गूढ-गंभीरतेचा शोध घेणारी कविता, सामाजिक-राजकीय आशयाची कविता, निसर्गकविता, प्रेमकविता, स्त्रीविषयक कविता अत्यंत यशस्वीपणे लिहिणार्या कवी कुडतरकरांच्या कवितेची दखल गोमंतकातील साहित्याभ्यासकांनी विशेषत्वाने घेतलेली दिसत नाही. संख्यात्मकदृष्ट्या कुडतरकरांचं कवितालेखन कमी असेल परंतु ते गुणात्मकदृष्ट्या अत्यंत संपन्न आणि समर्थ आहे. या गुणात्मकतेचं संबंधितांना झालेलं विस्मरण मात्र अनाकलनीय म्हणावे लागेल.
...
गूढ-गंभीर अध्यात्मविषयीची एक चिंतनशील दृष्टी कवीकडे दिसून येते त्याचप्रमाणे गूढत्त्वाच्या खोल-सखोल शोधातून गवसलेला नवीन अन्वयार्थ सांगण्याची कवीमनातील धडपडही दिसून येते.
...
अस्तित्त्वशोधाची ही अनामिक ओढ कवीमनाला पुरती गुरफटून टाकते आणि त्यातून व्यक्त होणारा काव्यात्म अनुभवही त्याच गूढ-गंभीर स्वरूपात व्यक्त होतो.
...
कुडतरकरांच्या कविमनाला निळ्या रंगाचं कमालीचं आकर्षण दिसतं. त्यांच्या किमान दहा कवितांतून त्यांच्या अंतर्मनातील नीलमप्रीतीचे प्रतिबिंब उमटले आहे. निळा रंग हा अथांग अनंताच्या शोधाचं प्रतीक म्हणूनही त्यांच्या कवितेत व्यक्त होतो. बोरकरांच्या नंतर इतकं नीलमप्रेम कुडतरकरांच्याच कवितेत व्यक्त झालेलं दिसतं.