(दिगंबरा कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीतील लेखक अवधूत कुडतरकर यांचे ह्रद्गत)
तसा खुलासा करणं, ह्रद्गत वगैरे सध्या कालबाह्य बनलेलं आहे. आपण या पृथ्वीवर अवतीर्ण होताना दिगंबर असतो व येथून जाताना दिगंबर बनवतात, तसा दिगंबर सर्वत्र असतो; पण चर्मचक्षूने तो दिसत नसतो. कुठे दिसला तरी त्यावर आपला विश्वास बसत नाही. विश्वास बला तरी सांप्रतकालात त्याचा निभाव लागणं कठीण;म्हणून आपल्याला वाटतं तेवढ वास्तव समजावं.
एक दिवस कविवर्य प्रा. वसंत सावंत यांच्याशी गप्पागोष्टी रंगल्या असता ते म्हणाले, ‘कुडतरकर, आपण जे सांगितलं त्यातूनच एक चांगली कलाकृती निर्माण होईल.’
अशा प्रकारे बिजाला अंकुर फुटला. कविमित्र एस. डी. तेंडुलकर व प.पू. गुळवणी महाराजांकडून दीक्षा घेतलेले श्री. हनुमंत डिचोलकर यांनी प्रथम वाचक म्हणून आपली स्पष्ट मते सांगितली. श्री. नारायणराव आठवले यांच्या सूचनेनुसार पहिल्यांदा पुनर्लेखन केले. गोमंतक मराठी अकादमीने 1991च्या कादंबरी लेखनस्पर्धेत प्रथम पारितोषिक देऊन गौरविले. मुद्रितशोधक श्री. मनोहर बोर्डेकर ह्यांनी आपुलकीने व चिकित्सक वृत्तीने मुद्रितशोधन केले.
नंतर वेल वाढू लागली. कळ्या उमलू लागल्यावर कविमित्र सुदाम मोटे यांनी भ्रमरगतीने सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. मधू मंगेश कर्णिक यांच्यापर्यंत सुगंध पोहोचवला.
श्री. मधू मंगेश कर्णिक यांनी सविस्तर सूचना देऊन वेलीसाठी मांडव घातला. मांडवावर वेल फुलू लागल्यावर मान्यवर प्रकाशक श्री. अशोक कोठावळे यांनी फुलं एका सूत्रात गुंफली. ही पुष्पशब्दमाला आता आपल्या हाती सुपूर्द करीत असून तिचं काय करावं हे आपणच ठरवणार आहात.
पहिली आवृत्ती : 1998, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई |
नवीन आवृत्ती : 2012, मित्र समाज प्रकाशन, कुंकळ्ळी (गोवा) |