एक मुलाखत

(‘काळ बदलला तरी माणसाची व्यथा तीच...’ या शीर्षकाची मुलाखत ‘पाथेय’ गौरविकेत आढळली. ती मिलिंद म्हामल यांनी घेतलेली आहे, असे नमूद होते. मुलाखतीच्या शेवटी ही मुलाखत ‘मैत्र’मध्ये जून 2005 च्या अंकात प्रसिद्ध झाल्याचे म्हटले आहे. गोमंतक मराठी अकादमीच्या मुखपत्राचे नाव ‘मैत्र’ होते.)



गेली तीस वर्षे आपण सातत्यानं लेखन करीत आहात. आपल्या जीवनातील प्रवासात आपण अनेक अनुभव घेतले आणि ते कागदावर उतरविले. लेखनाची प्रेरणा आपणाला कुठून मिळाली ?

              तशी लेखनाची प्रेरणा स्वयंभू असावी. एकांतात गुणगुणण्याची सवय अगदी बालपणातली. ‘व्यंकटेश स्तोत्र’ ही देवीदास कवीची कविता आईच्या मुखातून श्रीगणेशा लिहिण्यापूर्वीच नेहमी ऐकत होतो. हरिभजन, रामायण ग्रंथाची पारायणे आई करायची. अशा प्रकारे मराठी भाषा सतत कानावर पडायची. बाराखडी तिनंच शिकवली. प्रसिद्ध झालेलं सगळं वाचायची, परंतु मी साहित्यिक व्हावं असं तिला वाटत  नव्हतं. नातेवाईकही त्यानं नोकरी करावी, साहित्यानं पोट भरणार नाही वगैरे सांगून उद्वेग निर्माण करत होते. पण माझा एक निर्धार होता. अध्यात्म व साहित्य हा जीवनाचा अविभाज्य भाग होता. सारस्वत विद्यालयात अ‍ॅड. पांडुरंग मुळगांवकर यांच्या हस्ते ‘छोट्या गोष्टी’ हे पहिलं बालकथेचं पुस्तक प्रकाशित झालं. त्यावेळी मी नववीत शिकत होतो. शिक्षकांनी कौतुक केलं. दुर्गा प्रिंटिंग प्रेसच्या सहकार्यानं ते प्रसिद्ध झालं. घरच्या मंडळींकडून पोषक प्रोत्साहक शब्द कधीच मिळाले नाहीत. दु:खद घटना, संकटं लेखनास पुरक ठरली. विषयच स्वत:हून पुढ्यात आले. अन्नाचा कण पोटात नसताना आलेली अनुभूती दिगंबराची उपासमार दाखवताना उपयोगी पडली. आध्यात्मिक अनुभूती अलौकिक जीवन चिचित करण्यात उपयोगी पडली. वाचनामुळं कुणाचं अनुकरण न करता स्वत:ची वाट शोधता आली. हाताला मिळेल  ते वचत होतो. त्यामुळं वेगवेगळे प्रवाह अभ्यासता आले. ज्येष्ठ व मित्रमंडळीकडून प्रोत्साहन मिळालं. शंकर रामाणी, केशव सद्रे, माधवराव गडकरी, प्रा. रवींद्र घवी, प्राचार्य गोपाळराव मयेकर, शशिकांत नार्वेकर या ज्येष्ठांचं प्रोत्साहन प्रेरक ठरलं. दै. राष्ट्रमत, दै. गोमंतक, दै. नवप्रभा, दै. तरूण भारत या सर्वांचं सहकार्य मिळालं. ‘सत्यकथा’नं ‘रंभागर्भ’ कविता स्वीकारून माझ्यातील न्यूनगंड दूर केला व आत्मविश्‍वास निर्माण झाला. दै. सकाळ, दै. मराठा, दै. लोकसत्तामध्ये कविता प्रसिद्ध होऊन गोव्याच्या बाहेर ओळख झाली.


आपल्या म्हापशातील दत्तवाडीच्या वास्तव्याबद्दल आणि म्हापसा बस स्टँडवरच्या पुस्तकविक्रीबद्दल अनेकदा ऐकलं आणि वाचलही. जीवन चालविण्यासाठी काहीतरी करणं भाग होतं. पण आपण पुस्तकविक्रीद्वारे जीवन चालविण्याचा संकल्प केलात ?

         दत्तवाडीला छंद म्हणून सुबोध वाचनालय सुरू केलं. दहा पुस्तकांच्या भांडवलावर पाचशे पुस्तके जमा झाली. नंतरच्या काळात बागायत,घरदार सार्‍यांचा जाहीर लिलाव होऊन जगण्यासाठी म्हापसा बसस्थानकावर फूटपाथवर पुस्तक विक्रीचा धंदा सुरू केला. फूटपाथ असल्यानं नातेवाईक ओळख न दाखवता पुढेे जात. पुस्तकं विकत भर उन्हातही लेखन चालू होतं. खूप लिहिण्याची ऊर्मी होती, पण कागद आणायला पैसा नव्हता. कॅलेंडरच्या तुकड्यांवर मी कविता लिहीत होतो. ‘रंभागर्भ’ची निर्मिती अशीच तुकड्या तुकड्यावर झाली. ‘रंभागर्भ’ला पुरस्कार मिळाल्यावर एक रीम कागद खरेदी केला, त्याचा उपयोग ‘दिगंबरा’ लिहिण्यासाठी करता आला. दै. नवप्रभातील ‘स्वामी सगुणानंद’ नावानं सदर तसेच माझ्या नावानं ‘जनविजन’ सदर पुस्तकविक्री करत असता लिहिलं. यावेळी श्री. सुरेश वाळवे यांनी सहकार्य दिलं. सर्व मजकूर ते स्वत: वाचून पाहत. वाचकांच्या प्रतिक्रिया सांगत. पुस्तकविक्रीचा व्यवसाय निवडण्यामागं अशी कारणं होती. माझी स्वत:ची प्रकाशित केलेेली पुस्तकं ठेवता येत होती. एका दुकानदारानं आपला संपूर्ण साठाच उधारीवर दिल्यानं खिशात काही नसताना व्यवसाय करता आला. ‘नाईक अ‍ॅण्ड सन्स’ने बसायला जागा दिली. श्री. रघुवीर सिरसाट यांनी पुस्तकाची शोकेस ठेवायला जागा दिली. त्यामुळेच बेकार राहण्याचं संकट टळू शकलं. या काळात म्हापशात मिळालेलं सहकार्य कधीच विसरता येणार नाही. माझ्या जीवनाच्या जडण-घडणीत म्हापसावासीयांचं सहकार्य मिळालं नसतं, तर साहित्य -  लेखनच नव्हे, तर जगणहीं कठीण झालं असतं. शालेय जीवनात व नंतरही म्हापसा शहरानं स्वत:चा ठसा उमटवला.

आपला असा खास वाचकवर्ग आणि मित्रमंडळी आहे. त्याबद्दल थोडंसं...

        दै. ‘नवप्रभा’तील ‘जनविजन’ स्तंभलेखनामुळे अनेक चाहते मिळाले. ‘दिगंबरा’तील अनेक अनुभव त्यात वास्तव म्हणून प्रसिद्ध झालेत. अनेकांचे चांगले अभिप्राय मिळाले. बा. द. सातोस्कर, पु.शि.नार्वेकर, लक्ष्मीनारायण पारज, प्रभाकर भिडे, अनेक ज्येष्ठांनी कौतुकाची थाप पाठीवर मारली. हे सदर एक वर्ष चालविलं. पुस्तकविक्री करत फूटपाथवर लेखन चालू होतं. नंतर लक्ष्मीनारायण पारज यांनी आपलं जुनं कार्यालय लेखनासाठी दिलं. एक वर्ष हे सदर चालवून नंतर दै.‘तरुण भारत’मध्ये ‘स्वैर’नावाचं सदर सुरू केलं. या सदरामुळं आणखी नवीन वाचकवर्ग मिळाला. प्रत्येक वर्तमानपत्राचा स्वत:चा वाचकवर्ग असतो. पूर्वीचे वाचकही ते लेखन वाचायचे व अभिप्राय सांगायचे.
       मित्रमंडळींबद्दल सांगायचं झालं तर थोडक्यात सांगणंही कठीण. स्वत:च्या नात्यापेक्षा मित्रमंडळीचं नेहमीच सहकार्य मिळत आहे. नरेंद्र बोडके यांचा स्नेह सख्ख्या भावाहून अधिक होता. अगदी त्याच्या घरी सुद्धा परकेपणा नव्हता. ‘बुलंद’च्या संपादकपदाचा राजीनामा दिला तेव्हा तो रागावला, पण व्यक्तिगत मित्रत्वात बाधा आली नाही. कविमित्र शंभू बांदेकर यांनीही वेळोवेळी सहकार्य दिलं. उपसभापतीपदी असतानाही पूर्ववत स्नेह ठेवला. अ‍ॅड. रमाकांत खलप प्रतीवादीचे वकील म्हणून थोडा दुरावा निर्माण झाला, पण व्यक्तिगत पातळीवर मी त्यांचं सहकार्य मागितलं व त्यांनी दिलं नाही असं कधी घडलं नाही. अगदी ‘दिगंबरा’ गौरविकेलासुद्धा त्यांनी उदार अंत:करणाने सहकार्य दिलं. व्यापारी सुहास शिंदेही संकटाच्यावेळी पाठीमागं उभे राहिले. प्रा. अनिल सामंत, शिवानंद तेंडुलकर, जयकृष्ण सांगोडकर (त्या काळात कविता लिहायचे), पत्रकार गुरुनाथ नाईक, डॉ. सुरेश नागवेकर, रामनाथ नाईक (म्हापशाचे), सुदाम मोटे, प्रकाश काणेकर (व्यापारी) अशा सर्वांचंच सहकार्य मिळत होतं. साहित्यिक मित्रांबरोबर नव्या लेखनावर चर्चा होत होती. त्यातून कलाकृती सकस होण्यास मदत व्हायची. आपली मतं स्पष्टपणे सांगायचीहा अलिखित नियम होता. लेखन प्रसिद्ध होण्यापूर्वी झालेली चर्चा फायदेशी ठरायची. परस्परांना नेहमी भेटायचं, चर्चा करायची असे ते दिवस होते.


1972च्या सुमारास आपण ‘नवयुवक साहित्य मंडळ’ ही संस्था स्थापन केली. तशी प्रेरणा  कुठून मिळाली आणि त्याचं प्रयोजन काय होतं ?

        1972 सालचे दिवस खूप काही करावं  असं वाटणारे होते. मानवता, समाजसेवा आदर्श वगैरेच्या स्वप्नीय कल्पनांचे दिवस. वास्तवाचे  चटके बसले नव्हते. साने गुरुजी, महात्मा गांधी यांच्या विचारांनी मन भारावलं होतं. तरुण मित्रांनी नवयुवक संघ स्थापन केला होता. नंतर साप्ताहिक ‘न्याय गर्जना’चे संपादक वसंत टोमके भेटले. त्यांची गर्जना काही दिवसांतच ओसरली व ते हताश होऊन गोवा सोडून गेले. या संघाच्यावतीनं नवोदितांच ‘कोरी पाटी साहित्य संमेलन’ घेतलं. प्रा. गोपाळराव मयेकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनातून नवोदित साहित्य मंडळ निर्माण झाले. संपूर्ण गोव्यातून कोकणी व मराठी साहित्यिक या संमेलनास उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यानं ‘ज्योत अंधार दिव्याची’ हा प्रतिनिधीक काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. भाषिकवाद या काळात नव्हता. नंतर कोकणीवाद सुरू झाला. आकाशवाणीवर मराठीला सावत्रपणाची वागणूक मिळू लागली. त्याचा परिणाम कोकणी व मराठी असे दोन गट निर्माण झाले व आम्ही ‘सलोखा’ मुखपत्र फक्त मराठीत सुरू केलं. कोकणी लेखन बंद केलं. मराठी भाषा  व साहित्य यासाठी वाहून घेण्याचा निर्णय मंडळातर्फे घेण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मराठीच्या परीक्षा घेणं सुरू केलं. नरेंद्र बोडके, डॉ. सुरेश नागवेकर, प्रा. अनिल सामंत, योसेफ दूपदाळे, जयकृष्ण सांगोडकर, मिलिंद जोशी, दीपक प्रभुदेसाई यसगळी मंडळी एकमेकांना भेटत होती व साहित्यावर चर्चा वगैरे कार्यक्रम अधूनमधून करत होतो. भाषावादातील मतभेद व्यक्तिगत पातळीवर आणले नाहीत. म्हणून मराठी राजभाषा सत्याग्रहासाठी उपोषण केलं, तेव्हा सत्याग्रह मराठीप्रेमींना पाणी आणून देण्याची जबाबदारी कट्टर कोकणी साहित्यिकानं स्वीकारली. फक्त तो व्यासपीठावर बसला नाही. अशा अनेक आठवणी आहेत. नवोदित मराठी साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देणं हा मुख्य उद्देश होता.

1984 साली म्हापसा येथे सुप्रसिद्ध साहित्यिक नरेंद्र बोडके यांच्या सहकार्यानं आपण त्यावेळी गाजलेलं ‘बुलंद’ हे मासिक चालविलं. तो अनुभव कसा होता ?

           साप्ताहिक ‘बुलंद’चा अनुभव खरोखरच विलक्षण असा होता. सुरुवातीला आम्ही ‘बुलंद’ दिवाळी अंक प्रसिद्ध केला. जाहिराती भरपूर मिळाल्या. त्यातून साप्ताहिक सुरू केलं. यातून स्वत:ची घरं, छापखाना वगैरे स्वप्न रंगवली. नरेंद्राच्या लेखणीनं सगळ्यांना आकर्षित केलं. एक हजार प्रतींवरून चक्क आठ हजारपर्यंत खप वाढला. अनपेक्षित असा सगळीकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. स्वत: विक्रेतेे अंक कधी येणार अशी चौकशी करत. एकाच पक्षाशी बांधिलकी न ठेवता मराठी भाषेची बाजू घेईल तो आपला असं धोरण ठेेवलं होतं. ह्यात म.गो.पक्षातील उमेदवार जास्त होते. तसं सर्वांचं सहकार्य मिळत होतं. अंक आणखी चांगला व्हावा म्हणून नरेंद्रला ऑफसेट प्रिंटिंग करावंसं वाटलं  अन् सर्व रक्कम संपून स्वप्नावर पाणी पडलं.

तुमच्या ‘रंभागर्भ’ ह्या दीर्घकवितेत अनेककेंद्री अनुभूती एकसंघपणे साकारली आहे. सारी प्रतिभासृष्टी गूढ वाटते. आपल्या ‘रंभागर्भ’ ह्या कवितेच्या आशयासंदर्भात…

          ‘रंभागर्भ’कविता मानवी जीवनावरचं विविधरंगी चिंतन होतं. अनेकपदरी काव्य असल्यानं प्रत्येक कडव्यांचा अर्थ व्यक्ती-व्यक्तीनुसार बदलत जातो. वास्तव व अध्यात्म हा मूळ स्रोत. कुणीही वाचावं, अशी द्वय अर्थाची  रचना असल्यानं अनेकांना ही कविता आवडली. ‘सत्यकथे’नं ही कविता स्वीकारली होती, पण मी पुस्तक काढण्याची घाई केल्यामुळं ‘सत्यकथे’च्या वाचकांना मुकलो, कारण नंतर ‘सत्यकथा’ बंद पडलं.

समाजातील खोटारडेपणा, नकलीपणा तुम्ही अनुभवलात, त्याला शब्दाचे रूप देऊन तुम्ही साहित्यनिर्मिती केलीत, त्याबद्दल अधिक सांगावयाचं आहे काय ?

           ‘दिगंबरा’ ही कादंबरी आज लिहिली असती तर खूप वाहवा झाली असती. बुवाबाजी, भ्रष्टाचार आज तर कितीतरी पटीनं वाढलेेला आहे. दामदेव लंगडेबुवा फिके ठरतील. बाकी सगळं तेच आहे. जीवनमूल्यांची पडझड चालूच आहे.

गोमंतकीय मराठी कादंबरीच्या इतिहासात ‘दिगंबरा’ ह्या आपल्या कादंबरीला वेगळे स्थान आहे. ‘दिगंबरा’ कादंबरीची निर्मिती कशी झाली ? कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर वाचकांचा प्रतिसाद कसा होता ?

             ज्येष्ठ कविमित्र वसंत सावंत फूटपाथवरच्या दुकानात मला भेटायला आले. त्यांच्याशी गप्पागोष्टी चालू असता  ते म्हणाले, अरे, यावर चांगली कादंबरी होईल. अशीच आत्मकथनात्मक पद्धतीनं लिहून श्रीविद्या प्रकाशनला पाठव. त्या दिवसापासून ‘दिगंबरा’ लिहायला सुरूवात केली. अनेक सूचनांनुसार फेरफार केले. तीन वेळा पूर्ण लेखन केलं व शेवटी मॅजेस्टिक प्रकाशनच्या सूचनेनुसार शेवटचा हात फिरवला. श्री. मधुभाई कर्णिक यांचं मौलिक सहकार्य मिळालं. कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर बृहन्महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला. वि.शं.चौगुले, शंकर सारडा, नारायण सुर्वे, परेन जांभळे, सुभाष भेण्डे, रवींद्र घवी, डॉ. केशव सद्रे, ग्रामोपाध्ये अशा अनेक ज्येेष्ठ साहित्यिकांनी कादंबरी आवडल्याचं सांगितलं. अहमदनगरच्या एका वाचकाला ‘दिगंबरा’खूपच भावली असं कळालं. प्रा. रवींद्र घवी यांच्या शेेजारी राहणार्‍या एका प्राध्यापकानं सद्गतीत स्वरात अशी कादंबरी या वर्षांत वाचली नसल्याचे सांगून अभिनंदन केलं. डॉ. आनंद पाटील सरांनी या कादंबरीची गॉर्की, नायपाल यांच्याशी तुलना करणारा निबंध इंग्रजीत सादर करून आश्‍चर्याचा सुखद धक्का दिला. अनेक वाचकांना कादंबरी भावली.


आपल्या ‘दिगंबरा’ ह्या कादंबरीवर मोठा वाद निर्माण झाला, त्यासंबंधी आपल्याला काय सांगायचय ?

                कादंबरीवर वाद झाला त्याचं मला काही वाटलं नाही. फक्त एका साहित्यिकाने माझ्यावर व्यक्तीगत टीका करून हे आत्मवृत्त असून याच्यापेक्षा चंद्रकांत जाधवांनी खूप दु:ख भोगलं आहे...वगैरे सांगितलं याचं वाईट वाटलं. दलितांची भूक व इतरांची भूक वेगवेगळी नसते. जन्मानं नसेल, पण परिस्थितीनं काही काळ तरी मी दलितच बनलो होतो. हा अनुभव साहित्यात येणं स्वाभाविक होतं.  दुसर्‍या एका गृहस्थानं ‘दिगंबरा’ अश्‍लील आहे, स्त्रीदेहाचं भयंकर वर्णन आहे वगैरे सांगितलं. त्यांनी अमुक कलमाखाली अटक करावी असं सांगितलं. तसा मी जाम घाबरलो. त्या दिवशी लगेच अटक होईल असं वाटलं. यातील गंमत म्हणजे काही दिवसांनी त्याच टीकाकारानं ‘दिगंबरा’तील लंगडे महाराजांचं संपूर्ण कथानक नाव बदलून चक्क आपल्या नावाने ‘दै. नवप्रभा’त लिहिलं. यात मला समाधान वाटलं. त्यानंच टीका केलेल्या चोपड्यात स्वत:च्या नावानं प्रसिद्ध करण्याएवढा मजकूर त्याला गवसला. नंतर त्या गृहस्थानं विजय तेंडुलकरांची ‘कादंबरी एक’ वाचून म्हटलं, यात फारच भयंकर आहे. त्यामानाने ‘दिगंबरा’त तसे काहीच नाही. आता मला सांगा, त्या गृहस्थानं मला अटक करवून घेतली असतर तर विजय तेंडुलकरांच्या कादंबरीत याहून भयंकर आहे असे जाहीरपणेे सांगितलं असतं? वास्तविक ‘दिगंबरा’त तसं काहीच नाही. ‘दिगंबरा’त आहे तो माणूस. माणूस जे करतो, पाहतो त्याचे त्याच्या मनावर असंख्य तरंग जमा होत असतात. ‘दिगंबरा’ तर मनावरचे सगळे तरंग पुसून वेगळ्या आंतरिक विश्‍वासाकडं झेप घेत आहे. ते वर्णन आलं असतं तर पुढचा आत्मदर्शनाचा जो भाग आहे, त्याला महत्त्व नसतं, कारण माणूस वासना दडपण्याचा जेवढा प्रयत्न करतो तेवढ्या त्या जास्तच उफाळून येत असतात. हा निसर्गाचा नियमच आहे. ‘दिगंबरा’ने कोठेही वासना दडपलेल्या नाहीत. सगळं खुल्लमखुल्ला सांगितलं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट दिगंबर यात कुठेही वाहवत नाही किंवा चविष्ट वर्णन पण करत नाही. बाह्य मन व  अंतर्मन याचा संघर्षही तो तटस्थपण पाहतो. वासना चेतवण्यासाठी कुठलीही घटना लिहिलेली नाही. शेवटी दिगंबर त्या रूपककथेचा केशवच्या बडबडीचा कंटाळा आल्याचे सांगतो. असं शृगारिक घटनांचे स्पष्टीकरण केलं.
           काळ बदलला तरी माणूस तोच आहे. नव्या सहस्रकातही सगळ्या घटना आहेत. माणसाचे फक्त कपडे बदलतील. त्याची व्यथा, अंतर्मन तसंच राहणार. उद्या घरोघरी इंटरनेट आले तरी लोक त्यालाही फुले वाहतील. काही बदल झालेत. पण मी जाणीवपूर्वक भडकपणा टाळला. चांगली कविता काल आवडायची, आज आवडते, उद्याही आवडेल. तिला काळाचं बंधन नसतं. तसंच कादंबरीचंही आहे. तशीच ‘दिगंबरा’ अंधश्रद्धेच्या विरोधात आहे म्हणून ‘दिगंबरा’ कादंबरीतून प्रबोधनाचं कार्यही बरंच घडू शकेल. आध्यात्मिक क्षेत्रातील खोटेपणा, भोंदुगिरी तुम्ही दाखवलात हे सगळे भोंदू साधू दिगंबरला भेटले. आज याची खूप गरज आहे. आज अनेक जण कुंडलिनी जागृत करतो म्हणतात. आध्यात्मिक क्षेत्रात तो खोटेपणाआहे. त्यावर प्रकाश टाकला म्हणून ‘दिगंबरा’ कादंबरीमुळे प्रबोधनाचेही काम बर्‍याच प्रमाणात होऊ शकेल.

आपण बालसाहित्य, कविता कादंबरी अशा प्रकारचे विविध लेखन केलं आहे. एखाद्या विशिष्ट विषयावर लिहिण्याचा विचार आहे काय ? सध्या काय लिहिताय ?

          संकल्प करतो, पण वेळेअभावी सिद्धीस जात नाही. एक नाटक व कादंबरी अर्धवट राहिलीय. नियमित प्रवासाचा ताण असह्य होत असल्याचं घरी गेल्यावर आणखीन काम करण्याचा उत्साह राहत नाही. कवितालेखन चालू असतं. मूड येईल त्याप्रमाणे.

गोमंतक मराठी अकादमीत आपण अनेक वर्षं कामाला आहात, त्या निमित्तानं आपणाला अनेक लेखकांना भेटण्याची संधी मिळाली, त्याचा  आपणाला कसा फायदा झाला ?

           मोठी माणसं जवळून पहायला मिळाली. अर्थात पुढं भविष्यकाळात त्याचा फायदा होऊ शकेल. आपलं काम आपण करायचं. चांगल्या कृतीचं फळ उशिरा का होईना पण निश्‍चितपणं मिळतं हा आजवरचा अनुभव आहे. 

साहित्याची निर्मिती कशी होते ? नवीन लेखकांनी त्यासाठी कोणते परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे ?

         साहित्यनिर्मितीची प्रत्येकाची प्रक्रिया वेगवेगळी असते. कुणी एकटाकी लेखन करतात, कुणी दिवस दिवस चिंतन-मनन करून मग झपाट्यानं लिहितात. नवीन लेखकांनी जास्त वाचन करावं. त्या विषयाचा अभ्यास करावा. लेखन लिहिले की पुन्हा चिंतन करून पुनर्लेखन करावं.